MNS Hotstar Office : अमेय खोपकरांच्या नेतृत्वात मनसेचे कार्यकर्ते हॉटस्टारच्या ऑफिसात घुसले.
MNS Hotstar Office : मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. OTT प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेट समालोचन मराठीत उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठले. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरी यांनी वरळी येथील हॉटस्टारच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला.
हॉटस्टारवर क्रिकेट प्रक्षेपण करताना मराठी समालोचनाचा पर्याय का उपलब्ध नाही, हॉटस्टारवर मराठी भाषा का नाही, यामुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. सध्या मनसेचे काही पदाधिकारी हे हॉटस्टारच्या लोअर परळ या ठिकाणी असलेल्या कार्यालयात धडकले आहेत. मनसे नेते अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. (MNS Hotstar Office)
तीन तास मनसे कार्यकर्त्यांनी हॉटस्टारच्या कार्यालयात ठिय्या दिला. त्यांच्याकडून सातत्याने हॉटस्टारवर क्रिकेट प्रक्षेपण करताना मराठी समालोचनाचा पर्याय द्यावा, अशी मागणी केली. अखेर मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे हॉटस्टारने मराठीत समालोचन सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.

महाराष्ट्रात आम्हाला मराठी भाषेसाठी भांडावं लागतं
यावेळी अमेय खोपकर म्हणाले की, मी भेटायला आलो नाही, तर धमकी द्यायला आलो आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा वापरावी, यासाठी जर का आंदोलन करावं लागत असेल, तर याच्यासारखी शोकांतिका नाही. महाराष्ट्रात आम्हाला मराठी भाषेसाठी भांडावे लागते आणि इथे आल्यानंतर हे लोक मराठी माणसाला पुढे करतात. याचा अर्थ दोन मराठी माणसांनी भांडत बसायचे. (MNS Hotstar Office)
जे कोणी गुप्ता आहेत, ते यांना वरुन ऑर्डर देणार. आम्ही इथे आलो होतो आणि त्यांना स्पष्ट सांगितले होते की, जोपर्यंत तुमच्याकडून लेखी स्वरुपात काही मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आता हॉटस्टारने लेखी स्वरुपात आम्हाला पत्र दिले आहे. येत्या ICC ट्रॉफीपासून क्रिकेटचे मराठीत समालोचन सुरु होईल, असे हॉटस्टारने सांगितले आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी माणसानेच माज करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही.
मराठी सोडून हॉटस्टारवर तमिळ. तेलुगु, हरियाणा, पंजाब, कन्नड अशा सर्व भाषा आहेत. मग मराठी नको का? कोणतंही आंदोलन असेल तर हे मराठी लोकांना पुढे करतात. जर इथे मराठी अधिकारी आला नसता तर आम्ही १०० टक्के चर्चा केली नसती, आज चित्र वेगळं असतं. आम्ही मराठी भाषेची गळचेपी अजिबात सहन करणार नाही, असे अमेय खोपकर यावेळी म्हणाले. (MNS Hotstar Office)
प्रजासत्ताक दिनी दिला होता इशारा
‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्याचं समालोचन हरयाणवी आणि भोजपुरी भाषेतूनही केलं जातंय, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच लागेल, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी “एक्स”वर केली होती. त्यात 8 भाषांमध्ये समालोचन उपलब्ध असल्याचे त्यांनी दाखविले होते. त्यापैकी ७ भाषा या भारतीय आहेत. मात्र, मराठीचा त्यात समावेश नाही.
गंगेत डुबकी मारुन गरिबी दूर होणार का? मल्लिकार्जुन खर्गेंनी उडवली महाकुंभ स्नानाची खिल्ली
