World Saree Day : आपल्या भारतीय स्त्रियांचं संपूर्ण आयुष्यच जणू “साडी” या दोन अक्षराभोवती फिरत असतं.आपल्या घरातली आई-आजी किंवा शाळेत आपल्या बाई यांना तर साडीत वावरताना बघतच मोठे होतो आपण.आणि तिथेच आपल्याला या साडीबद्दल कुतूहल निर्माण होतं
पण साडीची उत्क्रांती कशी झाली ते जाणून घेऊया ??
प्राचीन जैन आणि बौद्ध साहित्यात नमूद केल्यानुसार ‘साडी’ हा शब्द प्राकृत ‘सत्तिक’ या शब्दापासून विकसित झाला आहे. साड्यांचा इतिहास प्राचीन संस्कृतींपर्यंतचा आहे. साडीचा इतिहास 20 व्या शतकातील पॅरिस डिझायनर्सनी तयार केलेल्या साड्यांशी हा साधा पोशाख परिधान केलेल्या स्त्रीच्या प्राचीन उत्तर भारतीय टेराकोटाशी संबंधित वाटतो. काही लोकांना असे वाटते की भारतीय साडीवर ग्रीक किंवा कुठल्या रोमन टोगाचा प्रभाव आहे, जी प्राचीन रोमन मूर्तींवर दिसून येते.
आधुनिक साडी, आपल्याला आज जी साडी माहीत आहे, ती 15 व्या शतकातील आहे. त्या वेळी, साडी नेसण्याच्या अनेक पद्धती होत्या आणि त्यापैकी बहुतेकांना ब्लाउजची आवश्यकता नव्हती कारण ते ड्रेप्स परिधानकर्त्याला योग्यरित्या झाकण्यासाठी पुरेसे होते. जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हा साडीने परिवर्तन केले. त्यांच्या उपस्थितीने, भारतीय स्त्रीला त्यांच्या साडीच्या खाली ब्लाऊज आणि पेटीकोट घालावा लागला आणि नंतर ती प्रथा रूढ झाली. स्वातंत्र्यपूर्व भारतात, “निवी” शैलीची साडी खूप लोकप्रिय होती. स्वातंत्र्योत्तर काळात बॉलीवूडच्या उदयानंतर साडीमध्ये मोठे परिवर्तन झाल्याचं पाहिलं मिळालं.
भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून अथवा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात.तर काही साड्या ज्याठिकाणी तयार होतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून ठरते.
साडीचे जवळपास दीडशेहुन अधिक प्रकार आहेत
अर्धरेशमी,ऑरगंडी,ऑरगेंझा साडी,रुंद काठाची साडी,काठा पदराची साडी,कोयरीकाठी साडी, क्रेप प्रिंटिंगची साडी,खडीकामाची,गर्भरेशमी,चिटाची,चिनार चौकटीची साडी,छापाची साडी (प्रिंटेड साडी),जरतारी साडी,जरीपदरी साडी,जरीचे काठ असलेली साडी,जाडी भरडी,जोडाची साडी (खानदेश),टमटम साडी ठिपक्याची साडी,तलम साडी,तुकडा साडी,दंडिया (सहावारी साडी),नऊवारी साडी, नायलॉनची साडी,पट्ट्यापट्ट्याची साडी,पाचवारी साडी,पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू),प्लॅस्टिक जरीची,प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी, बांधणी (राजस्थानी-गुजराती),वायल,रुंद पदराची साडी, रेशमी साडी, कृत्रिम रेशमी साडी,लखनौ चिकन साडी,सहावारी साडी (दंडिया),सुती साडी, सुरतेची साडी, सेलम साडी, हातमागाची साडी आणि अश्या कित्येक साड्या देशभरात उपलब्ध आहेत. खरं पाहिलं तर सध्या साडी हा केवळ कपड्याचा तुकडा राहिलेला नाही.
तर हा आता भारताचा समृद्ध वारसा, कारागिरी आणि विविधतेचा तो जिवंत पुरावा झालाय. दक्षिण भारतातील शाही रेशमी साड्यांपासून ते उत्तरेकडील रंगीबेरंगी हातमागाच्या चमत्कारांपर्यंत, साडी तिच्या फॅब्रिकमध्ये विणलेल्या अनेक कथांचं प्रतिबिंब आहे. पारंपरिक ड्रेपिंग शैली टिकून राहिल्या असताना, समकालीन महिलांनी देखील जुन्या आणि नव्याचं मिश्रण स्वीकारले आहे.
परंतु साडींचे एवढे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध असतानाही महिला वर्ग हमखास प्राधान्य देताना दिसतात ते पैठणी साडीला ”पैठणी” हा शब्द खास करुन अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी संबंधित आहे. पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला २००० वर्षाची पंरपरा असून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाल आहे .
एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने -चांदी, हिरे -माणिके यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे यांचे जर वापरुन तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई.
एक सहावारी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. साधारणपणे पाचशे ग्रॅम रेशीम धागे आणि अडीचशे ग्रॅम जर लागते. पैठणीचे वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, आदी रंगामध्येही तयार होण्यास सुरुवात झालीसाडीच विशेष महत्व म्हणजेच सर्वसमावेशकता, सांस्कृतिक प्रतिनिधित्व आणि स्वत:ची सहज अभिव्यक्ती एकत्रित करणारे वस्त्रच होय.
तसेच दैनंदिन परिधानात साडीची लोकप्रियता वाढताना दिसतीय यात काही नवल वाटण्यासारखे मुळीच नाही. जगभरातील तरुण लोक आपली फॅशनही बदलत साडीचा वारसा पुन्हा चालवत आहेत. निर्माते, डिझाइनर आणि कलाकार हेदेखील आपल्या परीने साडीला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे साडीला एक वेगळाच आणि आकर्षक लुक मिळून अधिकाधिक महिलांपर्यंत ती पोहचते आणि याची मागणीही वाढत चाललेली दिसून येते.