Mumbai 26/11 Attack : मुंबईवरील 26/11 हल्ल्याशी संबंधित एका मोठा आरोपी अमेरिकन तुरुंगात बंद आहे. त्याचा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mumbai 26/11 Attack : मुंबईवर 2008 साली 26/11 चा भीषण हल्ला झाला होता. आजही मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह अन्यत्र अंदाधुंद गोळीबार केला होता. आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत.
याच हल्ल्यातील एक आरोपी तहव्वुर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. एकप्रकारे अमेरिकी कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यर्पण करारातंर्गत तहव्वुर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता. सत्र न्यायालयाने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा केला होता. पण राणाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.(Mumbai 26/11 Attack)

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर लगेच शुक्रवारी याबाबत निर्णय झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली. तहव्वुर राणाला आता भारतात आणलं जाईल. त्याच्यावर इथे खटला चालेल. 26/11 हल्ल्यातील त्याचा रोल काय? कारस्थान कसं रचलं? या सगळ्याची चौकशी होईल.
तहव्वुर राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली होती. हेडलीच्या इशाऱ्यावर तो संपूर्ण कट अमलात आणत होता. राणा डेविड हेडलीचा राइटहॅण्ड होता. कंट्रोल रुममध्ये जो माणूस बसलेला तो तहव्वुर राणाच होता असं म्हटलं जातं. मुंबई हल्ल्यातील दोषी राणा भारतात आल्यानंतर तपास यंत्रणांना 26/11 हल्ल्याच्या कारस्थानाबाबत बरीच माहिती मिळू शकते .(Mumbai 26/11 Attack)
अमेरिकेत त्याला अटक कधी झालेली?
भारताने अमेरिकन कोर्टात मजबूत पुरावे सादर केले. यात राणाचा सहभाग स्पष्ट झाला. राणाला 2009 साली शिकागो येथून अटक करण्यात आली होती. FBI ने त्याला अरेस्ट केली होती. राणा हा पाकिस्तानी ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव आहे.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले होते. मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितले होते. त्यानंतर राणाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.(Mumbai 26/11 Attack)
राणाला ही शेवटची संधी होती. याआधी त्याने अमेरिकेच्या विविध न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळले गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून त्याचे प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
राणाचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले होते. त्याने थोड्या काळासाठी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा दिली. 1997 मध्ये तो कॅनडाला गेला. तिथे इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाला आणि अखेरीस त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. 2009 साली डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे एक चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची योजना राणाने आखली होती. याप्रकरणात शिकागोच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते.(Mumbai 26/11 Attack)
26/11 हल्ल्याशी कसा संबंध
अटकेनंतर तहव्वूर राणाने कबूल केले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली पाकिस्तानमधील त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात गेला होता. अमेरिकन कागदपत्रानुसार, 2005 च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटीकडून भारतात प्रवास करून तिथे पाळत ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.

2006 च्या सुरुवातीस हेडलीने एलईटीच्या दोन सदस्यांसह मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्याबाबत चर्चा केली. हेडलीने राणाला याची माहिती दिली आणि त्यांनी राणाच्या फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे कार्यालय वापरण्याचा निर्णय घेतला, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.(Mumbai 26/11 Attack)
हेडलीच्या साक्षीनुसार तसेच ईमेल आणि इतर कागदपत्रांच्या माहितीनुसार, राणाने फर्स्ट वर्ल्डशी संबंधित व्यक्तीला हेडलीसाठी कागदपत्रे तयार करण्याचे निर्देश दिले आणि हेडलीला भारताच्या प्रवासासाठी व्हिसा कसा मिळवायचा याबद्दल सल्ला दिला. मुंबईवरील हल्ल्यापूर्वी राणाने शिकागोमध्ये इमिग्रेशन लॉ सेंटर चालवणाऱ्या रेमंड सँडर्सच्या माध्यमातून हेडलीला भारतात मल्टिपल-एंट्री बिझनेस व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली, तसेच आर्थिक सहाय्यही केले. त्याने हेडलीला सप्टेंबर 2006 मध्ये 41937 रुपये, ऑक्टोबर 2006 मध्ये 67605 रुपये, नोव्हेंबरमध्ये 17636 रुपये आणि डिसेंबर 2006 मध्ये 83775 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.
मार्च 2016 मध्ये मुंबईतील विशेष न्यायालयासमोर उलटतपासणीदरम्यान, हेडलीने न्यायालयाला सांगितले की, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) मेजर इक्बाल यांच्या सूचनेनुसार हल्ल्यासाठी लोकांची भरती करण्यासाठी म्हणून त्याने भाभा अणु संशोधन केंद्राला भेट दिली होती. राणाला याची माहिती होती. ताजमहाल पॅलेस हॉटेलवरील हल्ल्याच्या तपशिलांचीही राणाला माहिती होती. त्याने हेडलीशी हल्ल्याच्या लक्ष्यांबद्दल सविस्तर चर्चा केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेला राणा हवा आहे आणि त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, फसवणुकीच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे तयार करणे आणि इतर गुन्ह्यांचा आरोप आहे.(Mumbai 26/11 Attack)
संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; असदुद्दीन ओवेसींसह 10 खासदार निलंबित