Chhaava Movie Controversy : ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली.
Chhaava Movie Controversy : या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील एका दृश्यावरून मोठा वाद झाला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या दृश्यावरून हा वाद सुरू आहे, ते लेझीम नृत्याचे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात येणार असल्याचे उतेकरांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उत्तेकर म्हणाले आम्हाला राज ठाकरेंचे वाचन दांडगे आहे, त्यांना इतिहास चांगल्याप्रकारे ज्ञात आहे, महाराजांबद्दल त्यांचे खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमके काय बदल करायला हवेत, हे मी त्यांच्याकडून जाणून घेतले. चर्चेदरम्यान त्यांनी मला काही सूचना केल्या, त्या खूप महत्त्वपूर्ण आणि चांगल्या सूचना आहेत. त्यांनी खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले. त्याबद्दल राज साहेबांचे आभार मानतो. (Chhaava Movie Controversy)

दिग्दर्शकांचा मोठा निर्णय
चित्रपटातील लेझीम नृत्याचे सीन्स आम्ही डिलीट करणार आहोत. राज ठाकरेंनीही मला तोच सल्ला दिला. त्या सीनमध्ये आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला असे वाटत असेल की, आपले राजे असे नाचले नसतील, तर तो सीन आम्ही काढून टाकू. कारण तो चित्रपटाचा काही मोठा भाग नाही. तो एक छोटा भाग आहे. त्यामुळे आम्ही तो सीन डिलिट करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रेक्षकांना कळकळीची विनंती
‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकारांना दाखवणार का, असा प्रश्न लक्ष्मण उतेकरांना विचारण्यात आला. त्यावर ते पुढे म्हणाले, या चित्रपटाबाबत आम्ही इतिहासकारांबद्दल चर्चा करणार आहोत आणि स्क्रिनिंगचेही आयोजन करण्यात आले आहे. मला फक्त एवढेच कळकळीने सांगायचे आहे की, आमची संपूर्ण टीम गेली चार वर्षे यावर रिसर्च करतेय आणि एवढा मोठा चित्रपट बनवण्यामागचे कारण हेच आहे की, छत्रपती संभाजी महाराज काय होते, हे संपूर्ण जगाला कळायला पाहिजे. पण जर का एक-दोन गोष्टी त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलिट करायला आम्ही हरकत नाही. (Chhaava Movie Controversy)
महाराज लेझीम खेळले नाहीत का?
शिवाजी सावंतांच्या ‘छावा’ या कादंबरीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत. मग नेमका हात कुठे घालायला म्हणून आम्ही ‘छावा’ या कादंबरीचे अधिकृत हक्क विकत घेऊन त्यावर आधारित हा चित्रपट बनवला आहे. ‘छावा’ या कादंबरीत लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज हे होळी हा उत्सव साजरा करायचे, होळीच्या आगीतून तो नारळ खेचून घ्यायचे. लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे, त्यात आजचे कुठले डान्स स्टेप्स आहेत असे नाही. आपल्याला लाज वाटावी, असे त्यात काहीच नाही.

महाराज कधी लेझीम का खेळले नसतील? हा प्रश्न नेहमी उभा राहतो. त्यावेळी ते वीस वर्षांचे होते. जेव्हा महाराजांनी बुरहानपुरवर हल्ला केला, बुरहानपूर जिंकून ते रायगडावर जेव्हा आले, तेव्हा एक वीस वर्षांचा राजा लेझीम खेळलाही असेल. त्यात गैर काय? असे मला वाटते. पण, जर लोकांच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील, तर तो लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा आणि महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे आम्ही तो नक्की डिलीट करू, असे त्यांनी स्पष्ट केले. (Chhaava Movie Controversy)
वाल्मिक कराडच्या डॉक्टरांची चौकशी करा, मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी